Loksabha : ‘मी काँग्रेसमध्ये होतो, आहे आणि राहणार…’

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन – रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील. मात्र, मी काँग्रेसमध्ये होतो, आहे व काँग्रेसमध्येच राहणार असे वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे, आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझा व राष्ट्रवादीचा विषय असून, त्यांच्या पदरात मी माप टाकावे, असे राष्ट्रवादीनेही काही पुण्य केले नाही असेही गोरे म्हणाले. शिवाय, साताऱ्यात उदयनराजेंसोबत असून, माढ्याचा निकाल तुम्हाला चांगलाच दिसेल असेही त्यांनी यावेळी बोलतना स्पष्ट केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर काही वेळातच जयकुमार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. सुमारे दोन तास त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. यानंतर जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, “लोकसभेच्या दृष्टीने आमदार चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. कोणत्या लोकांच्या काय अडचणी आहेत, हे त्यांना सांगितले. दोन्ही काँग्रेस एकत्र काम करताना तू मोठा, की मी मोठा हा प्रश्‍न आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे, ही पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कोणीही गृहित धरू नये.”

यावेळी जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, “रणजितसिंहांचा निर्णय तुम्हाला विचारून झाला का ?” या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “त्यांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांना स्वातंत्र्य आहे. भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील. मात्र, माढा मतदारसंघावर चांगले लक्ष असून, माढ्याचा निकालही चांगला दिसेल. पृथ्वीराज चव्हाण हे माझे नेते असून, त्यांच्याशी चर्चा करूनच मी माझा निर्णय घेईन.” असे त्यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us