‘या’ कारणाने गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तांतरणाला विलंब

सेनेगल :वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला १ फेब्रुवारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली. अटकेनंतर पुजारी याला भारतात आणण्याची कारवाई सुरु आहे. मात्र पुजारीच्या हस्तांतरणाला विलंब लागू शकतो. रवी पुजारीने आपली ओळख नाकारली असून सेनेलग सरकारकडे त्याने त्यासंदर्भात अर्ज केला आहे. पुजारीच्या वकिलांनी त्याचे नाव अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सेनेगलमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. त्यांनी रवी पुजारी गँगच्या कारवाया आणि त्याच्या विरोधातील पुराव्यांची फाईल सेनेगलच्या तपास यंत्रणेकडे सुपूर्द केली आहे. पुजारीच्या वकिलांनी सेनेगलच्या अधिकाऱ्यांकडे त्याचा पासपोर्ट जमा केला असून त्याचे नाव अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे. पुजारीची पत्नी पद्मा आणि त्याच्या तीन मुलांकडे बुरकीना फासोचे पासपोर्ट आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारीनी ओळख नाकारल्याने त्याच्याविरुद्ध आणखी कागदोपत्री पुरावे गोळा करण्यासाठी भारतीय दूतावासाने वेळ मागितली आहे. मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना रवी पुजारीच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेऊन ते तात्काळ सेनेगलला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. रवी पुजारीच्या दोन बहिणी जयालक्ष्मी सालियन आणि नैना पुजारी या दिल्लीमध्ये रहातात. त्यांचे डीएनए नमुने घेतले जाऊ शकतात.

दोन आठवडयांपूर्वी पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारीला अटक करण्यात आली. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेत. मुंबई आणि कर्नाटक पोलिसांच्या विनंतीवरुन इंटरपोलने त्याच्या विरोधात १३ रेड कॉर्नर नोटीस जारी केल्या होत्या.