UK चे PM बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितलं फ्रान्सचं नागरिकत्व, सांगितलं ‘हे’ कारण

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनने काही महिन्यापूर्वी युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून ब्रक्झिटची ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी फ्रान्सचं नागरिकत्व मागितल्याची माहिती समोर आली आहे. बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले जॉन्सन यांनी या वृत्ताला गुरुवारी दुजोरा दिला आहे.

स्टॅनले यांनी एका संवादादरम्यान सांगितले की, आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं आहे. जर खरं सांगायचे झाले तर मी फ्रान्सचाच आहे. माझ्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. त्यांची आई ही फ्रान्सची होती आणि त्यांचे वडिल हे देखील फ्रान्सचे नागरिक होते, अशी माहिती स्टॅनले यांनी एका रेडियोशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, माझ्या समोर हा प्रश्न आहे की माझ्याकडे पहिल्यापासुन काय आहे आणि मी याबाबत अतिशय खुश आहे, असेही त्यांनी म्हटले.

यापूर्वी स्टॅनले जॉन्सन यांची मुलगी आणि बोरिस जॉन्सन यांची बहिण रशेल यांनी मार्चमध्ये एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे वडिल स्टॅनले जॉन्सन यांना फ्रान्सचे नागरिकत्व हवे असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच त्यांना फ्रान्सचं नागरिकत्व मिळालं तर आपणदेखील फ्रेन्च बनू इच्छिते असेही रशेल यांनी म्हटले होते.