पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांना कोवीड लस मोफत देणार : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

कोलकता : पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांना कोवीड १९ ची लस मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( CM Mamata Banerjee ) यांनी आज केली आहे. याबाबत ममता बॅनर्जी ( CM Mamata Banerjee ) यांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी राज्य सरकारने बंगालमधील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी तृणमुल काँग्रेसने कंबर कसली आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु केले आहेत.

 

 

 

 

 

 

बिहार निवडणुकीत भाजपने सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात केली होती. जनता दलाबरोबर युती करुन भाजपने सत्ता मिळविली होती.

त्यानंतर आता भाजपने पश्चिम बंगालमध्ये भाजपने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गेले काही महिने सातत्याने पश्चिम बंगालचा दौरा करीत आहेत.

भाजपवर मात देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कोविड लस मोफत देण्याची घोषणा केली असल्याचे दिसून येत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती या वर्षी येत आहे. नेताजी हे बंगालची अस्मिता आहे. त्यामुळे त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी नेताजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याची घोषणा केली असून त्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. त्याच्या पावलावर पाऊल टाकून केंद्र सरकारनेही नेताजींची जयंती साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही समावेश करण्यात आला आहे.