माझं वय 85 नाही, पत्रकाराच्या त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून ते जिल्ह्यांच्या भेटी दरम्यान कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार राज्यातील हॉटस्पॉट आणि कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अशाच प्रकारे राज्याचा दौरा केला होता. त्यावेळी 80 वर्षाचा तरुण म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. आताही त्याच जोमाने कोरोनाच्या काळात राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी देखील संवाद साधत असून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मिश्किल टिपण्णी करत उत्तर देत आहेत.

काही दिवसांपूर्वी ते सोलापूर दौऱ्यावर होते. त्यानंतर शनिवारी औरंगाबाद येथील कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी, शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. आपले वय जास्त असून तुम्ही राज्यभर फिरत आहात. त्यामुळे, आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. माझे वय 80 आहे, पण 85 वर्षे असल्यासारखे प्रश्न तुम्ही मला विचारत आहात. शरद पवार यांच्या या उत्तरावर सभागृहात एकच हशा पिकला.

लोकांमध्ये काम करायला आवडतं
मी माणसांत रमणारा माणूस आहे, मला लोकांमध्ये जाऊन काम करायला आवडतं. त्यामुळे मी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करत असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर फिरत नाही, यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, कोरोनाचे संकट राज्यात सर्वत्र पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाण्यात अर्थ नाही. त्यांनी एकाच ठिकाणी बसून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.