बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत. असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केलं आहे . मुलाने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणे हा बालहट्ट आहे की काही निश्चित धोरण याबाबत स्ष्टीकरण द्या ,तसेच पक्षनिष्ठा सिद्ध करा, असे बाळासाहेब थोरात , विखे पाटलांना म्हणाले होते.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मौन बाळगलेल्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत . त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला . ते म्हणाले की, ‘बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत . पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल मी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मानतो , त्यामुळे माझे म्हणणे मी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. ‘

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात –

नगरच्या राजकारणात विखेंचे कडवे प्रतिस्पर्धी असलेले बाळासाहेब थोरात विखे-पाटलांवर जोरदार टीका करताना म्हणाले होते

की, ‘काँग्रेस पक्षाने विखे परिवाराला गेल्या पन्नास वर्षांपासून मागेल ती सत्तेची पदे दिली. त्यावरच विखेंच्या संस्था उभ्या राहिल्या. मुलाने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणे हा बालहट्ट आहे , की काही निश्चित धोरण, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. पण मागील अनुभव पाहता फायद्यासाठी विखे कुठेही जातील ,’विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असलेले राधाकृष्ण विखे-पाटील आपल्या घरातूनच पक्षाविरोधात झालेले बंड थोपवू शकले नाहीत. त्यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . निवडणुकीचा काळ आहे, रणसंग्राम जवळ आला असताना नेतृत्व करायचं त्यांचाच मुलगा पक्षांतर करतो हे काँग्रेससाठी नक्कीच चांगलं नाही. मुलाची जी भूमिका आहे तीच वडिलांचीही दिसत आहे,’ त्यामुळे विखेंनी पक्षनिष्ठा सिद्ध करावी, असं आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केलं होत.