‘बाबा मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड असं मुख्यमंत्र्यांप्रती शरद पवारांना वाटत असेल’ : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बाबा मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड असं मुख्यमंत्र्यांप्रति शरद पवार (Sharad Pawar) यांना वाटत असेल असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुण्यात (Pune) नवरात्रोत्सवानिमित्त (Navratri Festival) एनॅब्लर चॅरिटेबल ट्र्स्ट क्रिएटीव्ह फाऊंडेशन यांच्या वतीनं आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना विविध वस्तू भेट वाटप कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

‘बाबा मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड असं…’

चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार हे विरोधी पक्षाचे असेल तरी त्यांच्या विषयी मला नितांत आदर आहे. अनेक गोष्टींना त्यांनी न्याय दिला आहे. अशा नेत्याला मुख्यमंत्र्यांची वारंवार भलामण करावी लागत आहे याचं वाईट वाटतं. महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची पाठराखण करावी लागते. त्यांना वेळोवेळी प्रोटेक्ट करावं लागत आहे. परंतु पवार हे मनापासून करत असतील असं मला वाटत नाही. बाबा मी या वयात इतका फिरतोय तू ही किमान बाहेर पड असं मुख्यमंत्र्यांप्रति शरद पवार यांना वाटत असेल.”

‘धावपळीत केलेला नुकसानग्रस्त भागाचा दौरा उपयोगाचा नाही’

पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावत प्रवास करून पावसानं नुकसान झालेल्या भागाच्या केलेल्या पाहणी दौऱ्यावरही टीका केली आहे. पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी धावपळीत केलेला नुकसानग्रस्त भागाचा दौरा उपयोगाचा नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. झटपट निर्णय घेऊ शकतात. त्यामुळं नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीनं मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. त्यासाठी पंचनामे करत बसण्याची गरज नाही” असंही ते म्हणाले.

‘केंद्राकडून जी मदत जाहीर होईल ती बोनस समजावी’

पाटील असंही म्हणाले, “प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करण्यात काय अर्थ आहे. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारनं करणं गरजेचं आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागायची असते. राज्य सरकारनं शक्य तितक्या लवकर मदतीची घोषणा करावी. त्यानंतर केंद्राकडून जी मदत जाहीर होईल ती बोनस समजावी.”