‘मी घरात बसून राज्यासाठी 16000 कोटींची गुंतवणूक आणली’, उध्दव ठाकरेंनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 26 : मी घरात बसून राज्यासाठी 16 हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. राज्यातील उद्योगधंदे, गुंतवणूक, करोना विषाणूची साथ, या कालावधीनंतर राज्यातील आर्थिक परिस्थिती यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.

शिवसेना पक्षाचे खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेताना मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले. याच मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकार हातवर हात धरुन बसलेले नाही. राज्यातील गुंवणुकीबद्दल भाष्य करताना त्यांनी जून महिन्यामध्ये राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) अंतर्गत 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य कराराचा संदर्भ दिला. आणि घरात बसूनही काम करता येतं, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

महाराष्ट्र राज्यामध्ये जी 16 हजार कोटींची एमओयूची गोष्ट आहे, ती मी घरात बसून केलीय. मी कुठेही इकडे-तिकडे फिरत बसलो नाही. जी सिस्टीम उपलब्ध आहे, तिच्या माध्यमातून हे घडवून आणले आहे. काम करणारी सिस्टीम कार्यरत असली की कामं होतात. त्या कराराच्यावेळी काहीजण त्यांच्या देशातून सहभागी झाले होते. आपली काही लोकं ज्यामध्ये मी घरातून होतो, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि इतर सहकारी मंत्रालयातून सहभागी झाली होती, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांपूर्वी पार पडलेली सर्व पक्षीय बैठक असो किंवा इतर आढावा बैठकी असो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका करणार्‍या अनेक पोस्ट सोशल मिडियावर विरोधकांनी मागील काही दिवसांमध्ये व्हायरल केल्याचे पहायला मिळाले होतं. त्याचसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करून कोणत्याही विरोधकांचे नाव न घेता टोला हाणला.

राज्यामध्ये अधिक गुंतवणूक येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय प्रयत्न केले? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झालं तर सध्या अनिश्चितता नाही. आपण अनेक सार्‍या गोष्टी आणि सोयीसुविधा उभारत आहोत. मात्र, हे सर्व काही आपण गोष्टी गहाण टाकून करत आहोत, अशातली बाब नाही. पण, आपण अनेक नियम अधिक सोपे करत आहे.

जमिनीसंदर्भातील नियम असतील किंवा उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे यासारख्या गोष्टींवर सरकार काम करतंय. हे सर्व पाहिल्यावर जे एमओयू केले आहेत ते अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार जे काम करत आहे आणि जे वातावरण तयार केले आहे त्यातून जो विश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे ही गुंवणूक नक्कीच राज्यात येईल. ही गुंवणूक येत असताना अगोदरचे जे उद्योगधंदे आहेत ते काम करत आहेत. मात्र, पुन्हा परिस्थिती बिघडल्यास हे उद्योगधंदे लॉकडाउनच्या माध्यमातून काही काळ बंद ठेवण्याशिवाय इतर दुसरा तात्पुरता पर्याय उपलब्ध नाही.

सगळं काही संपलं आहे असा विचार करण्याची गरज नाही. मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणाला निराशावादी होऊ देणार नाही, असा विश्वास देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.

15 जून रोजी मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) अंतर्गत झाले करार
15 जून रोजी मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) अंतर्गत अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या दोघांनाही या सामंजस्य करारावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने सह्या केल्या आहेत.

… म्हणून चिनी कंपन्यांबरोबरचे करार पेंडींग
महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) अंतर्गत चीनच्या तीन कंपन्यांशी करार केला होता. यामध्ये हेंगली इंजिनिअरिंग ही चिनी कंपनी तळेगावात आपला कारखाना सुरु करणार होती. या माध्यमातून पुण्यातील औद्योगिक पट्ट्यामध्ये 250 कोटींची गुंवणूक करुन 150 जणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार होती. त्याचप्रमाणे चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स ऑटोमोबाईल कंपनी तळेगावमध्ये तीन हजार 770 कोटींची गुंतवणूक करुन 2 हजार 42 स्थानिकांना रोजगार देणार होती. पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन या तिसर्‍या चिनी कंपन्याबरोबरही 1000 कोटींचा करार केला होता. ही कंपनी तळेगावात कारखाना सुरु करणार होती. या कंपनीच्या माध्यमातून 1500 जणांना रोजगार मिळणार होता. मात्र, करार झाल्याच्या कालावधीत म्हणजेच 14 जून रोजी भारत-चीन सैन्यादरम्यान लडाखमधील गलवान येथील झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने केलेल्या करारामध्ये सहभागी असलेल्या चिनी कंपनी सोबतचा करार स्थगित केले आहेत. चिनी कंपन्यांबरोबरच करार पेंडींग आहे, अशीही माहिती उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे.

सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम पुढीलप्रमाणे :
एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी
हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार (हा करार चिनी कंपनीशी असल्याने सध्या या कराराला स्थगिती दिली आहे.)
असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी.
वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी.
हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार.
असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार.
इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार.
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500 (हा करार चिनी कंपनीशी असल्याने सध्या या कराराला स्थगिती दिली आहे).
इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500.
रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी
युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000.
ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 37700 कोटी आणि 2042 (हा करार चिनी कंपनीशी असल्याने सध्या या कराराला स्थगिती दिली आहे.)

यंदा वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री म्हणून मुलाखत…
दरवर्षी वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली जाते. मात्र, यंदा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुलाखत दिली आहे. त्यांची ही मुलाखत ऐकण्यासाठी तसेच पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. याबाबतची उत्सुकता त्याप्रमाणे निर्माण केली होती. शिवसेना पक्षाचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी हि मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीबाबत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमधून अनेक बाबींची पोलखोल होईल, असे सांगितले होते. मात्र, या मुलाखतीतून कोरोना साथ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याबाबत राज्य सरकारचे काय कामकाज असणार आहे? आणि हे कसे करणार आहे? याची माहितीही आणखी सविस्तर येणे अपेक्षित होते. या मुलाखतीतून अनेक अपेक्षित बाबींवर प्रकाश न टाकल्यामुळे हि मुलाखत म्हणजे ‘मॅनेज‘मुलाखत म्हणून टीका विरोधकांनी या अगोदरच केली आहे.

…अनेक प्रश्न सोशल मीडियातूनही उपस्थित
मुलाखत घेणारी व्यक्ती शिवसेना पक्षाची आणि मुलाखत देणारे मुख्यमंत्री देखील शिवसेना पक्षाचे आहेत. आणि त्यांची मुलाखत प्रसिध्द होणारे व्यासपीठ देखील शिवसेनेचे असल्यामुळे ही पूर्णत: मुलाखत मॅनेज आणि प्रसिध्दीसाठी केलेला प्रयत्न आहे, अशी टीकाही सोशल मिडीयातून होत आहे. दरवर्षी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख वाढदिवसानिमित्त मुलाखत देत असतात. ते त्यांच्या कामाचा आढावा देत असतात. मात्र, हीच मुलाखत अगोदर घेण्यात आली होती. त्यामुळे या मुलाखतीबाबत अनेक प्रश्न विरोधक तसेच सोशल मीडियातूनही उपस्थित केले जात आहेत.