पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तसंच पुढचा पंतप्रधान कोण होणार ही चर्चाही जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कोण होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा पंतप्रधान होण्यावर शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

मला जर थोडंसं राजकारण कळत असेल, तर मी नक्कीच सांगू शकतो की, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. मी काही ज्योतिषी नाही. पण मला असं वाटतं की त्यांना आवश्यक असलेलं संख्याबळ मिळणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असं मला वाटतं. त्यांचं संख्याबळ घटणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तो एकमेव सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. परंतु त्यांना सरकार स्थापण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाला पंतप्रधान पदासाठी नवा उमेदवार शोधावा लागेल, असं सुचक वतक्तव्यही त्यांनी यावेळी केले आहे.

चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणूकांनंतर आलेल्या निकालामुळे जनतेचा कल सत्ताधाऱ्यांना कळाला आहे. येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल हे त्यांनी माहीत झाले आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळला जाऊ शकतो. तसंच निवडणुकीत गैरप्रकार केला जाण्याची भीती पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवून दिले, परंतु याचे भाजपाने भांडवल करून झेंडे नाचवायला सुरुवात केली. कष्ट कोणी केले, शौर्य कोणी बजावले आणि छाती कोण बडवतोय ?, असा खोचक टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

दरम्यान, सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशासमोरची राष्ट्रीय आपत्ती आहेत, अशी टीका शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मोदी सध्या गांधी घराण्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत आहेत, परंतु याच घराण्यातील दोन पंतप्रधानांनी देशाच्या सेवेसाठी बलिदान दिले, त्याचा त्यांना विसर पडला आहे. यावरून मोदींची संकुचित विचारसरणी दिसून येते. जर देशाच्या पंतप्रधानांचे विचार संकुचित असतील, तर कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us