विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही : संजय निरूपम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. संजय निरुपम यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला असून हा निर्णय माझा अंतिम निर्णय असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. संजय निरुपम यांच्या निर्णयामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करून पक्षावरील आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये निरुपम यांनी म्हटले आहे की, यापुढे काँग्रेस पक्षाला माझी गरज नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाकडे मी फक्त एका जागेची शिफारस केली होती. मात्र, पक्षाने माझे ऐकले नाही मी शिफारस केलेल्या जागेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहोत. तसेच हा माझा अंतीम निर्णय असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

संजय निरुपम यांनी पुढे म्हटले आहे की, कदाचित पक्षाला आता माझी गरज नाही. अद्याप मी पक्षापासून दूर होण्याचा विचार केला नाही. मात्र, पक्ष नेतृत्व माझ्या बाबतीत ज्या पद्धतीने वागत आहे. त्यानुसार मला पक्षापासून दूर जाण्याचा लवकरच विचार करावा लागेल असे ट्विट करत त्यांनी पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे.

Visit : Policenama.com