पवारांनंतर आता सुभाष देशमुख यांचाही माढ्यातून यु-टर्न 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही काढता पाय घेतला आहे. ‘माढ्यातून लढणार असं मी म्हणालोच नव्हतो’ असं विधान करत त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानातून यु-टर्न घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. सुभाष देशमुख आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की , ‘मी असं म्हणालेलोच नाही की, मी इथून लढणार म्हणून’.

माढा लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून एक तर सुभाष देशमुख किंवा संजय शिंदे यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवण्याचा विचार भाजपकडून सुरु आहे. मात्र भाजपमध्ये अद्याप कोणत्याही नावावर एकमत झालेले नाही. यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह भाजपकडून इतरही नावांचा विचार केला जात आहे . त्या पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख यांनी केलेल्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपाचा माढ्यातील उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माढ्यातील राजकीय घडामोडी – लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून माढ्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले . त्यांनतर माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतून विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . तसेच माढ्यातील जागेवर दमदार उमेदवार लढवण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली केल्या जात आहेत. यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह भाजपकडून इतरही नावांचा विचार केला जात आहे.