मी कुठलीही गोष्ट अंधारात करणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन: भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे-पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे वडिल काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे-पाटलांनी भाजप प्रवेशाबाबत भाष्य केले आहे. मी कुठलीही गोष्ट अंधारात करणार नाही, मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असं विखे पाटील यांनी सांगितले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी विखे पाटलांनी त्यांची भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेईन. माझ्यासोबत कोण येईल हे प्रवेशावेळी कळेलच, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांच्यासह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यात मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत आहेत. त्यामुळे विखेंच्या जाण्याने काँग्रेसचे अधिकचे नुकसान होऊ शकते.

दरम्यान, विखे पाटील यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. मात्र ते भाजपामध्ये येतील याबाबत त्यांनीच सांगितलंय, असे गिरीश महाजनांनी स्वतः सांगितले. तसंच विखेंच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.