… म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. २०१४ च्या तुलनेत आगामी निवडणुकीत भाजपाप्रणित ‘एनडीए’ ला जास्त जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी हेच आगामी पंतप्रधान असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. तीन राज्यांमधील पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर नितीन गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाले होते. नितीन गडकरी यांनी देखील ‘नेतृत्वाने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारावी’, असे सूचक विधान केल्याने चर्चेत भर पडली होती. यावर माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला.

मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात आले. मी कोणत्याही स्पर्धेत नाही. मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगतो. मी कोणाच्या इशाऱ्यावर भाष्य करत नाही, असे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते. स्वप्न दाखवणारे नेते जनतेला आवडतात. परंतु ती स्वप्नं पूर्ण न केल्यास जनतेचा मार खावा लागतो. त्यानंतर विरोधकांनी गडकरींनी मोदींना इशारा दिल्याची दवंडी पिटली होती. गंगेचं प्रदूषण कमी झालं असून, गरिबांच्या घराघरात वीज पोहोचल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला आहे.

नेहरू, इंदिरा गांधींवर स्तुतीसुमने-

पंडित जवाहरलाल नेहरू हे एक चांगले लेखक होते. मी त्यांची पुस्तकं वाचली आहेत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्या विकासाचं मॉडल वेगळ होतं. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचीही स्तुती केली आहे. त्या अनेक पुरुष नेत्यांहूनही सक्षम होत्या, असंही गडकरी म्हणाले आहेत.