लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘हे’ मुख्यमंत्री देणार राजीनामा ?

बंगळूर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले असून आता कर्नाटकात देखील याचे लोन पसरले आहे. कर्नाटकचे  मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तुमच्या पक्षातील कुणालाही मुख्यमंत्री करा असेदेखील यावेळी कुमारस्वामी म्हटल्याचे कळते आहे. मात्र, राहुल गांधींनी त्यांची समजूत काढताना मुख्यमंत्रिपद तुम्हीच समर्थपणे सांभाळू शकता, त्यामुळे असा विचार करू नका, असे सांगितल्याचे समजते.

२३ तारखेला लागलेल्या लोकसभेच्या निकालात कर्नाटकमध्ये  काँग्रेस आणि निजदला फक्त प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. तथापि भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकत या आघाडीची वाट लावली. त्यामुळे नाराज झालेल्या कुमारस्वामी यांनी हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांना  फोन करून म्हटले कि, दोन्ही पक्षांतील वरिष्ठांमध्ये  सलोख्याची भावना नसणे, हेच पराभवाचे  मुख्य कारण आहे. मला मुख्यमंत्रिपद हवे, असा हट्ट मी धरला नव्हता. वडिलांच्या सल्ल्यामुळे मी मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते, मात्र काँग्रेस नेत्यांच्या आणि आमदारांच्या या वागण्यामुळे जनतेच्या राज्यातील विकासकामे करणे शक्य नाही. त्यामुळे अस्वस्थपणे मी या पदावर राहू शकत नाही. मला  मुख्यमंत्रिपदाची आसक्ती नाही. तुम्ही तुमच्या पक्षातील कोणाला मुख्यमंत्री करता त्याला करा, आमच्या पक्षाचा बाहेरून पाठिंबा राहील.

दरम्यान, यानंतर राहुल गांधी यांनी कुमारस्वामींची समजूत काढत  म्हटले कि, अशा कठीण परिस्थितीत तुम्ही राजीनामा दिला तर  हे पद सांभाळणारा तुमच्यासारखा दुसरा नेता नाही. भविष्यात काँग्रेसकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, सर्व बाबतीत सहकार्य मिळेल, याची हमी मी घेतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा तुमचा निर्णय मागे घ्या, असे राहुल गांधींनी आश्वासन दिल्यानंतर  त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याचे समजत आहे.