पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ विधानाबाबत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केला ‘हा’ खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की २०१४ मध्ये भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाआघाडी करून सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि विविध प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या. परंतु या प्रस्तावाबाबत मला काहीच कल्पना नाही असे शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनिल परब म्हणाले की, काँग्रेसला प्रस्ताव कोणी दिला आणि का दिला याबाबत मला कसलीच कल्पना नाही. या प्रस्तावाबाबत जास्त खुलासा हा पृथ्वीराज चव्हाण हेच करू शकतील असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली की, शिवसेनेने २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. काँग्रेसबाबत चर्चा झाली असावी परंतु राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं चर्चा केली नाही आणि हेच सत्य आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, २०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकार स्थापन झाले होते. तेव्हा भाजपा विरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेनं विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता आणि तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करून भाजपाला सत्तेपासून लांब ठेवावे असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव त्यावेळी मी फेटाळून लावला होता असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण केले आणि विरोधी पक्षच संपविण्याची भूमिका घेतली. या परिस्थितीत जर भाजपाकडे सत्ता गेली असती तर लोकशाही संपुष्टात येण्याला वेळ लागला नसता. म्हणूनच मी पर्यायी सरकारचा आग्रह धरला. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला सगळीकडून विरोध झाला होता मात्र मी आग्रह कायम ठेवला आणि सर्व आमदारांसोबत चर्चा केली. भाजपा हाच आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे खूप गरजेचे आहे हे पटवून दिले असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा –