‘मला युती तोडायची नाही, पण…’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निकालाला 14 दिवस उलटल्यानंतर देखील अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु असून शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. आज मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे सांगताना मला युती तोडायची नाही पण आम्ही मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच लोकसभेच्यावेळी जे ठरले त्याप्रमाणे भाजपने वागावे असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे.

सत्तास्थापनेवरून आज मुंबईमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर गेले आहेत. या ठिकाणी भाजपची बैठक सुरु असून काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी मौन पाळले असून कोणीही बोलू नये असे नेत्यांना सांगण्यात आले आहे. ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडणार नसल्याचे सांगितल्यानंतर भाजपने यावर आपली प्रतिक्रीया देण्यास नकार दिला असून नेत्यांनाही प्रतिक्रीया देऊ नये असे सांगण्यात आले आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे सांगितेल. तसेच कोणताही आमदार फुटू नये यासाठी सर्व आमदारांना रंगशारदा येथे ठेवण्यात आले आहे. भाजपने काय तो निर्णय घ्यावा असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेचा चेंडू भाजपच्या कोर्टात फेकला आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतेलेल्या निर्णयामुळे भाजपवर दबाव वाढला असून राजकीय घडामोडींना आता वेग आला असल्याचे पहायला मिळत आहे.

Visit : Policenama.com