मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही : शरद पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत ‘जाणता राजा’ किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावे, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. त्याच्या या वक्तव्याचा शरद पवारांनी आज चांगलाच समाचार घेतला. मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, मुंबईत बसून व्याख्यान देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन दुष्काळाची पाहणी करावी.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सातारा जिल्ह्यातील दुष्काळ परिसराची पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत सरकारवर टीका केली.

मुंबईत बसून व्याख्यानं आणि आव्हानं देत बसण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाची पाहणी करावी, तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल. मी दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यात फिरत आहे. तिथले लोक मला सांगत आहेत की, गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येते. चारा छावण्यांमध्ये खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामं मिळत नाहीत. दुष्काळ दौऱ्यादरम्यान मी लोकांचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला वेळ मागणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान दुष्काळाचा आढावा त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. पवार म्हणाले की, मी बातमी वाचली की, मुख्यमंत्री फोनवरुन दुष्काळाचा आढावा घेत आहेत. हे सगळं ठीक आहे, फोनवरुन कोणीही माहिती घेऊ शकतं, परंतु राज्यकर्त्यांनी राज्यभर फिरायला हवं, लोकांमध्ये जायला हवं, तेव्हाच त्यांना इथली परिस्थिती समजेल.