‘तू हिंदीत बोल’ म्हणणाऱ्या Airtel कर्मचाऱ्यास मनसेनं शिकवला धडा ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी ही आपली मातृभाषा आहे. सर्वांनाच आपल्या भाषेचा अभिमान असायला हवा. अनेकदा असे प्रकार समोर येतात की, महाराष्ट्रात राहूनच मराठीचा हेतुपरस्पर अपमान केला जातो. मुंबईतील बोरीवली मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल गॅलरीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अशाच मराठी द्वेषाबद्दल चांगलाच धडा शिकवला आहे. मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी यासंदर्भातील व्हिडीओ आणि घडलेला प्रसंग आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

बोरीवली येथील एका एअरटेल कंपनीच्या गॅलरीत एक मराठी युवक आपला मोबाईलचा रिचार्ज करण्यासाठी गेला. त्याला 249 चा रिचार्च करायचा होता. यासाठी त्यानं 500 रुपये एअरटेल कर्मचाऱ्याला दिले. त्याला एकूण 251 रुपये मिळावेत अशी अपेक्षा होती. एअरटेल कर्मचाऱ्यानं 1 रुपया कमी देत 250 रुपये परत केले. या युवकानं योग्य रक्कम न मिळाल्यानं विचारणा केली. तर कर्मचाऱ्यानं त्याला तुसड्या भाषेत त्याचे परतीचे पैसे देणं नाकारलं आणि वरून मला मराठी येत नाही तू हिंदी बोल अशी मागणीही केली. त्यानं सहकर्माचाऱ्यासोबत मिळून त्या युवकासोबत वादही घातला. या एअरटेल गॅलरीत 5-6 कर्मचारी होते. परंतु यातील एकालाही मराठी येत नव्हतं.

या युवकानं या घटनेनंतर मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांना फोन करून तक्रार सांगितली. यानंतर कदम यांनी बोरीवली विधानसभेतील मनसैनिकांना तातडीनं चारकोप येथील एअरटेल गॅलरीत त्या युवका सोबत पाठवलं. आधी तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी असं काही घडलंच नाही असं सांगितलं. मनसे स्टाईल नंतर मात्र सर्व गोष्टी कबूल केल्या आणि माफीही मागितली. सरतेशेवटी कर्मचाऱ्यानं सर्व कर्मचारी मराठी बोलतील आणि त्यांना मराठी भाषा शिकवण्यात येईल असं आश्वासन दिलं असं कदम यांनी सांगितलं. स्थानिक पोलिसांनी मात्र एअरटेल कर्मचाऱ्याऐवजी मराठी युवकालाच दम दिला असा आरोपही कदम यांनी केला.

कदम म्हणाले, मराठी भाषेचा मान जपण्यासाठी पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारदाराला जर तुम्ही दाबत असाल व उलटं फटकारणार असाल तर पोलिसांकडे येणारच कोण ? पोलिसांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली पाहिजे होती. असं न करता पोलिसांनी विषय दाबण्याचा प्रयत्न केला. मराठीचा अपमान इतर पक्ष सहन करतील परंतु मनसे कधीच सहन करणार नाही असंही कदम म्हणाले आहेत. मुंबईत अनेकदा परप्रांतीय नागरिकांकडून मराठी बोलण्यात नकार दिला जातो. अनेकांनी मराठी शिकून इथली संस्कृती जपली आहे. परंतु काही जण मात्र जाणीवपूर्वक मराठी बोलण्यास नकार देतात. त्यामुळं मनसेकडून कायमच अमराठींना मराठीचा धडा शिकवला जातो.