#MeToo : एम.जे. अकबर म्हणतात.., मला काहीच आठवत नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – #metoo मोहिमेअर्तंगत प्रिया रमाणी यांच्यासह अनेक पत्रकार महिलांनी एम. जे अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. एम. जे अकबर यांना या आरोपांमुळे ऑक्टोबर २०१८ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी दिल्ली न्यायालयात अकबर यांचा जबाब शनिवारी नोंदविण्यात आला असून, त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. मात्र अकबर यांनी बहुसंख्य प्रश्नांना, आपल्याला आठवत नाही, असे उत्तर दिले.

अकबर हे आज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले. एम.जे. अकबर यांची जवळपास दोन तास न्यायालयात चौकशी करण्यात आली. रमाणी यांच्या वकील रिबेका जॉन यांनी अकबर यांची उलटतपासणी घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

कुणी-कुणी लावले आरोप ?

६७ वर्षीय एम. जे. अकबर हे ‘एशियन एज’ या इंग्रजी वृत्तपत्राचे माजी संपादक आहेत. रमाणी यांच्या आरोपांनंतर हळूहळू आणखी २० पत्रकार महिलांनी अकबर यांच्याविरोधात आरोप केले. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्यासोबत काम केले होते. अकबर यांच्याविरोधात पुढे आलेल्या पत्रकारांमध्ये फोर्स मॅगझिनच्या कार्यकारी संपादक गजाला वहाब, अमेरिकी पत्रकार मजली डे पय कँप आणि इंग्लंडच्या पत्रकार रूथ डेव्हिड शामिल यांचा समावेश आहे.

पत्रकार अकबर यांचा प्रवास –

दैनिक ‘द टेलिग्राफ’ आणि ‘संडे’ नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलेले एम. जे. अकबर १९८९ मध्ये राजकारणात आले. तत्पूर्वी अकबर यांचे पत्रकारितेत मोठे नाव झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदारही झाले. पुढे अकबर यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला. मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेलेले एम. जे. अकबर जुलै २०१६ मध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री झाले.