जेसिका लालच्या मारेकऱ्याला बहिणीने केले माफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मॉडेल जेसिका लाल हत्या प्रकरणी तुरुंगात असलेला सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्माला जेसिका लालच्या बहिणीने माफ केले आहे. ”हत्येप्रकरणी मनू शर्मा जवळपास १५ वर्ष तुरुंगात होता. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. तुरुंगात त्याचे वर्तनही सुधारल्याचे मला तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले. त्यामुळे त्याला तुरुंगवासातून मुक्त केल्यास माझा कोणताही आक्षेप नाही,” असे पत्र जेसिकाच्या बहिणीने तिहार तुरुंग प्रशासनाला पाठवले आहे.

जेसिका लालची बहीण सब्रिना लालला तिहार तुरुंग प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवण्यात आले होते. हे पत्र जेसिका लाल हत्या प्रकरणातील दोषी मनू शर्माची तुरुंगातून सुटके विषयी होते. मनू शर्मा पंधरा वर्षे तुरुंगात असून त्याचे वर्तन सुधारले आहे. तुरुंगात अन्य कैद्यांच्या मुलांना शिकवणे, तुरुंगातील कामकाज डिजिटल करणे अशा विविध उपक्रमांमध्ये मनू शर्माने योगदान दिले होते. या आधारे आता त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. या वर्तुणुकीमुळे तुरुंग प्रशासनाने जेसिकाच्या बहिणीला पत्र पाठवले होते.

जेसिकाच्या बहिणीने या पत्राला उत्तर देताना त्यात म्हटले आहे,”जेसिकाच्या मारेकऱ्याला मी माफ केले आहे. माझ्या मनात आता कोणताही राग किंवा द्वेष नाही. माझ्या बहिणीच्या हत्येसाठी तो १५ वर्षांसाठी तुरुंगात होता. हे माझ्यासाठी पुरेसे आहे.”