चुकीला माफी नाही ! तुला किंमत चुकवावी लागेल, शरद पवारांनी अजित पवारांना ‘बजावलं’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शपथ घेतली. त्यांचे ही भूमिका राष्ट्रवादीच्या धोरणाशी विसंगत होती. त्यामुळे मी अजित पवारांच्या कृतीना पाठिंबा नाही हे प्राधान्याने स्पष्ट केले. त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार घरी आले. त्यावेळी तुझी चूक झाली. त्याची तुला किंमत चुकवावी लागेल, असे स्पष्ट बजावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्तास्थापने आधी राज्यात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. त्यानंतर या तीनही पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. तीनही पक्षांचे सरकार स्थापन होणे, अजित पवारांचे वागणे, मोदी आणि पवार भेट याबद्दल शरद पवार यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितले.

चुकीला माफी नाही
पक्षाच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेतली तर त्या चुकीला माफी करायची नाही, हे मी ठरवलं होतं. अजित पवार यांनी अचानक पहाटे जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकाने मला याबाबत फोन करून सांगितले. ज्यावेळी मी टिव्ही पाहिला त्यावेळी माझा विश्वास बसत नव्हता. मात्र, अजित पवार यांच्यासोबत जे आमदार शपथविधीच्या वेळी उपस्थित होते. त्यावरून माझ्या लक्षात आले की हे आमदार माझ्या सांगण्याशिवाय कुठेच जाऊच शकत नाहीत. त्यांना फसवून त्याठिकाणी नेले असावे.

मी हे सावरू शकतो, असा मला तेव्हाच विश्वास आला. मात्र, अजित पवारांच्या कृतीमागे माझा हात हे पटवून देणे मला आवश्यक होते. त्यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच अजित पवार यांच्यासोबत जे आमदार होते त्यांना पत्रकार परिषदेत ठामपणे आपली भूमिका मांडण्यास सांगितले, असे पवारांनी स्पष्ट केले.

म्हणून जयंत पाटलांनी शपथ घेतली
शपथ घेतली त्याच दिवशी सायंकाळी अजित पवार माझ्या घरी आले. माझी चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या चुकीची किंमत तुला मोजावी लागेल असे मी तेव्हाच बजावले होते. राज्यात तीनही पक्षांचे सरकार आणण्याचे ठरल्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक अजित पवारांना पहिल्या टप्प्यात शपथ दिली नाही. ही संधी जयंत पाटील यांना दिली. पक्षाच्या धोरणाशी विसंगत धोरण घरातल्या मंडळीने घेतले तरी त्याला माफ केले जात नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचे होते, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

अजित पवार मंत्रीमंडळात दिसणार नाहीत
अजित पवार यांना भविष्यात मंत्री किंवा उपमुख्यमंत्री करणार का यावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले, पक्षातील नेते, कार्य़कर्ते यांना अजित पवार सरकारमध्ये हवेत. ते नसतील तर कारभार चालविणे अवघड होईल असे त्यांचे मत आहे. मात्र, खुद्द अजित पवार यांनीच आपल्या कृतीमुळे तयार झालेले वातावरण स्वच्छ होईपर्य़ंत सरकारमध्ये सामील न होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अजित पवार मंत्रीमंडळात लगेच दिसणार नाहीत हे उघड झाले आहे.

Visit : Policenama.com