मी आतापर्यंत कधीच TikTok डाउनलोड केले नाही – आनंद महिंद्रा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सीमेवर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत आहे. विविध स्तरांतून चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. याचा फटका काही चिनी कंपन्यांना बसला आहे. तर अनेक भारतीय कंपन्यांना मात्र याचा फायदा होतोय. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या टिकटॉक या चिनी मोबाइल अ‍ॅपलाही भारतात सुरू असलेल्या विरोधाचा फटका बसला असून टिकटॉकच्या लोकप्रियतेत घट झाली आहे.

चिनी अ‍ॅप टिकटॉकच्या विरोधाचा जबरदस्त फायदा ‘चिंगारी’ या एका मेड इन इंडिया मोबाइल अ‍ॅपला झाला आहे. भारतीय पर्याय म्हणून हे अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय होत असून काही दिवसांमध्येच 25 लाखांहून जास्त वेळेस हे अ‍ॅप डाउनलोड झाले आहे.

अशातच महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी टिकटॉकचे ‘टेन्शन’ अजून वाढवणारे ट्विट केले आहे. मी आतापर्यंत कधीच टिकटॉक अ‍ॅप डाउनलोड केलेले नाही, पण मी नुकतंच चिंगारी अ‍ॅप डाउनलोड केले आहे, असे महिंद्रांनी सांगितले आहे. ट्विटरद्वारे, ‘टिकटॉकच्या मागणीत घट आणि चिंगारीची लोकप्रियता वाढली’ या आशयाचे एक वृत्त शेअर करत महिंद्रांनी हे ट्विट केले आहे.