‘मी राज्यमंत्री असताना मंत्र्यांच्या बैठकीत मीच तक्रारी करतोय, तक्रार मंत्री झालोय’ – बच्चू कडू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मी राज्यमंत्री असताना मंत्र्यांच्या बैठकीत मीच तक्रारी करतो. त्यामुळे मी तक्रार मंत्री झालो आहे. राज्यमंत्र्याला काहीच अधिकार नाहीत. त्यामुळे माझ्याच विभागाचे आदेश मला दुसऱ्या दिवशी बातमीतून कळतात, असा नाराजीचा सूर शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश (बच्चू) कडू यांनी व्यक्त केला. तसेच विधान परिषदेत शिक्षण नव्हे केवळ शिक्षकांचीच चर्चा होते. याला आम्ही राजकारणीच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद येथे गुरुवारी (दि. 4) उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येऊन सुरू केलेला जिल्हा परिषद लाइव्ह एज्युकेशन ॲप लाँच सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ‘ई-कट्टा’ने हे ॲप बनवले असून, त्याचे लाँचिंग मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कडू म्हणाले की, पैसा आल्यावर शिक्षणही बदलते. आता पैसेवाल्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण नकोसे झाले आहे. सरपंच, अधिकारी, शिक्षकांची मुलेच जिल्हा परिषदेच्या शाळेत जात नाहीत. आर्थिक दरी एकवेळ परवडेल. मात्र, ही शिक्षणाची विषमता परवडणारी नाही. हे बदलण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोना काळात गावातील 25 टक्के मुलेही ऑनलाइन आले नाहीत. त्याचा जाब कोण देणार, उगाच डंग-या बैलावर झूल टाकण्याचा प्रकार नको, असेही ते म्हणाले.

तसेच पूर्वी गावात शिक्षकाशिवाय कोणतेही काम होत नव्हते. त्यांच्याबद्दल प्रचंड धाक, आदरयुक्त भीती होती. तो काळ परत आणण्यासाठी शिक्षकांनी मनावर घेतले पाहिजे. त्यासाठी आता काम केले पाहिजे. आज आरोग्य, शिक्षणासह सर्वच विभागांची अवस्था वाईट आहे. ती परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समजदारीने शिकण्याची आज गरज आहे. काही शाळा सोडल्या, तर खाजगी शाळांकडून जास्तीची वसुली होतेय, त्याला लगाम लावण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, जालेंद्र बटुळे, अश्विनी लाटकर, जयश्री चव्हाण आदी उपस्थित होते.