दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या वेळी मी ‘तसं’ बोललोच नाही : प्रकाश जावडेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावून देखील भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान या पराभवानंतर भाजपा नेत्यांकडून पराभवाबाबत विविध कारणे समोर केली जात आहेत. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेली बेछूट टीका, गोली मारो, भारत-पाकिस्तानसारखी वक्तव्ये भाजपला भोवल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हते, असा दावा भाजपचे नेते आणि केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिशा’ अंतर्गत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जावडेकर म्हणाले, दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्यानंतर काँग्रेसची मते कोणत्या पक्षाकडे गेली हे माहीत नाही. भाजप हा शिकणारा पक्ष असून या पराभवातून आम्ही शिकणार आहोत, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.

दिल्लीमध्ये आप आणि भाजपमध्येच थेट लढत झाली. तसेच गोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली, हे अमित शहांचे निरीक्षण बरोबर आहे. पण या पराभवामागे इतरही कारणे आहेत. खरंतर भाजप हा शिकणारा पक्ष असून या पराभवातून योग्य तो बोध घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील प्रश्नांवर बोलताना जावडेकर म्हणाले, पुणे मेट्रोचे तिन्ही मार्ग 2022 पर्यंत पूर्ण होणार आहेत. वनाज ते कर्वे रोड आणि संत तुकाराम नगर ते बोपोडी या दोन मार्गांचे 12 किलोमीटर अंतराचे काम मार्च अखेर पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.