‘मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही नोटीस मिळाली आहे. यावर शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. आमच्यासारख्या काही लोकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच इन्कम टॅक्सच्या नोटिस पाठवून राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजेंडा असून मलाही इन्कम टॅक्सची नोटीस आली असल्याचे त्यांनी सांगीतले.

केंद्र सरकारनं आणलेला कृषी कायदा व त्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आयकर विभागानं 2009,2014 आणि 2019 च्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात मला नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल काही तक्रारी आहेत. त्यांच्यानंतर मलाही नोटीस आली आहे. तिला देखील नोटीस येणार आहे असं कळलंय. चांगली गोष्ट आहे. आमच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे, असे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार माला नोटीस पाठवण्यात आली आहे. काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. लवकरच मी त्यास उत्तर देणार आहे. उत्तर न दिल्यास दिवसाला 10 हजारांचा दंड भरावा लागेल असंही त्यामध्ये नमूद करण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांची महाराष्ट्रात वाढत असलेली संख्या, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना राणौत व शिवसेनेमधील वादाचं निमित्त करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा यांच्यासह काही जणांनी तशी मागणी केली होती. ही मागणी करणाऱ्या शरद पवारांनी टोला हाणला. राष्ट्रपती राजवट लागू करणं गंमत नव्हे आणि महाराष्ट्रात याची काही गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.