पंकजा मुंडे नाराज नाहीत हो…. : चंद्रकांत पाटील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पदवीधर निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून, भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात माजी मंत्री पंकजा मुंडे निकटवर्तीय प्रवीण घुगे यांच्याऐवजी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावर खुलासा करत पंकजा या नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. कामानिमित्त त्या बाहेर गेल्याने पत्रकार परिषदेस उपस्थित राहू न शकल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली. एका ठिकाणी शिक्षक परिषदेला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर विभागात संदीप जोशी, अमरावती नितीन धांडे, पुणे विभाग संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज नाहीत, असे मी हात जोडून सांगतो. विनंती आहे, जशी बातमी आहे, तशीच द्या, असे कळकळीने आवर्जून सांगितले. घराघरांत नाराजी असते, न्यायाची व्याख्या म्हणजे, एकाला न्याय बाकीच्यांवर अन्याय असेच असते. प्रवीण घुगे यांना उमेदवारी न दिल्याने पंकजा या काही नाराज नाहीत. त्यांच्या घरी चहापान झाले. कारखान्याच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्या आज आल्या नाहीत. त्यांचा एसएमएसदेखील आला,असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, बोराळकर यांच्या उमेदवारीमुळे बंडखोरीची शक्यता असून, बीडचे माजी जिल्हाप्रमुख रमेश पोफळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.