‘मी रुग्णालयात स्वत:चे कपडे स्वत:च धुतो’ : मुख्यमंत्री चौहान

भोपाळ : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या विळख्यात लोकप्रतिनिधी देखील अडकत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने राजधानी भोपाळ येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या रुग्णालयातूनच ते सरकारची सर्व कामे पहात आहेत. याच दरम्यान त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. आपण या संपूर्ण परिस्थितीला कसे सामोरे जात आहोत याबाबत त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते मी माझे कपडे रुग्णालयातच स्वत: धुवत आहे, असे सांगताना दिसत आहेत.

मंगळवारी मुख्यमंत्री चौहान रुग्णालयातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांच्या बैठका घेत होते. मी दवाखान्यात स्वत:च चहा बनवत आहे. मी स्वत: माझे कपडे देखील धूवत आहे. कारण कोविड रुग्ण आपले कपडे धुण्यासाठी दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. मला कपडे धुण्याचा फायदा आहे. माझ्या हातावर शस्त्रक्रिया झाली. कित्येक फिजिओथेरपी नंतरही मी माझी मुठी आवळू शकत नव्हतो. पण आता कपडे धुतल्यामुळे मी माझ्या मुठी आवळू शकतोय, असे चौहान यांनी म्हटले. मला वाटते की आपण आपली स्वत:ची छोटी कामे नेहमीच करत राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री रुग्णालयाच्या निळ्या रंगाच्या गाऊन आणि मास्कमध्ये दिसत आहेत.

राज्यातील कोविडच्या परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ही बैठक घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी ट्विटद्वारे दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री चौहान यांनी रविवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला यात आपण एकदम ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाची लक्षणे दिसून येताच तातडीने चाचणी करुन घेण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले.