तरुणाचा भन्नाट प्रश्न अन् पुणे पोलिस आयुक्तांचे अफलातून उत्तर, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि. 8) ट्विटरवरून पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी वाहतूक, मास्क, पोलिसांची वागणूक, महिला सुरक्षा, नियम आदीबाबत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची गुप्ता यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी अनेकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही प्रश्न विचारले. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सामान्य माणसासारखी उत्तरे दिली. एका तरुणाने पुणे पोलिस आयुक्तांना थेट त्याच्या प्रेमातील अडचण सांगत त्यातून काहीतरी मार्ग काढून द्या असे सुचवले. आयुक्तांनी पण त्याला आपल्या खास शैलीत उत्तर देत आधारही दिला आणि मार्गदर्शन केले.

सर..मला आवडणारी मुलगी कालच बालाजीनगरला राहायला आली आहे. मी तिला प्रपोजही केले. परंतु, ते नाकारून तिने आपण फक्त मित्रच आहोत असे सांगितले. प्लिज सर..तुम्ही काहीतरी करून द्या, असा प्रश्न थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्विटरवर विचारला होता. त्या तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त गुप्ता म्हणाले की, त्या मुलीची इच्छा नसेल तर तू काहीच करू नकोस. आम्हीही काही करणार नाही. पण आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबतच आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना आम्ही मास्क घालू का, चारचाकी वाहनात मास्क अनिवार्य आहे का, आणखी किती दिवस वापरावा लागेल, असे अनेक प्रश्न नागरिकांनी विचारले. त्यावर गुप्ता म्हणाले की, आम्ही सर्व पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहोत. मास्क घातल्याने तुम्ही कोरोना आजारापासून दूर राहू शकता. दंड आकारण्यापेक्षा तुमची आरोग्य आणि सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. हेल्मेटसक्ती नसूनही हेल्मेट घालणे योग्य आहे का असे नागरिकांनी विचारल्यावर आयुक्त म्हणाले, हेल्मेटची निवड सुरक्षेसाठी करा. त्याची आवड म्हणून करू नका. स्त्रियांना सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच सतर्क राहणार आहेत. रात्री – अपरात्री कधीही मदत लागल्यास पोलीस स्त्रियांना पहिले प्राधान्य देतील, त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे ते म्हणाले.