मी शिवरायांचा आदर करतो, पण… : आ. इम्तियाज जलील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आ. हर्षवर्धन जाधव यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त मोटार सायकल रॅली नंतर आमदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाणार आहे अशा आशयाचे होर्डिंग गेल्या काही दिवसांपासून शहरात झळकत होते. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी जलील यांची जवळीक वाढल्याने शहरात लावलेल्या होर्डींगच्या मजकुराने राजकारण रंगत आहे. सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी प्रश्न उपस्थित केला असता, त्यावर उत्तर देताना आ. जलील यांनी सांगितले की, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान आहे. शिवरायांचा मी आदर करतो. पण आमच्यामध्ये पूजन नसते. शिवजयंती उत्सवानिमित्त मला रैलीमध्ये येण्यास आमंत्रित केले आहे. मी रैलीत सहभागी होणार आहे.

शिवाजी महाराज हे कोण्या एका समाजाचे नाहीत त्यांचे महान कार्य बघता सर्व धर्म व जातीचे लोक त्यांचा आदर करतात. यावर राजकारण व्हायला नको. हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर मित्रत्वाचे नाते आहे, इतर अनेक लोकांशी सुद्धा माझे मित्रत्वाचे नाते आहे. जवळीक वाढणे म्हणजे ते वंचित आघाडी चे उमेदवार असतील असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. शहरात वेगळीच चर्चा चालू आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत जलील यांनी दिली आहे.