मोठा खुलासा : 3 वेळा आत्महत्या करू इच्छित होता मोहम्मद शमी, स्वतः सांगितलं कारण

पोलिसनामा ऑनलाईन – कौटुंबिक आरोपामुळे भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला काही दिवसांपूर्वी एका समस्येला तोंड द्यावे लागले होेते. शमीची पत्नी हसीन जहानने त्याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बीसीसीआयने काही दिवसांसाठी शमीचा करारही रोखून ठेवला होता.  त्यावेळी आपल्या मनात एकदा नव्हे तर तीन वेळा आत्महत्येचा विचार आल्याची कबुली मोहम्मद शमीने दिली.

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासोबत मोहम्मद शमीने इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारल्या. यादरम्यान 2015 विश्वचषकादरम्यान झालेली दुखापत, पत्नी हसीन जहानसोबत झालेला वाद यावर शमीने भावना बोलून दाखवल्या. विश्वचषकादरम्यान मला दुखापत झाली होती, त्यामधून सावरायला मला किमान 18 महिन्याचा कालावधी लागला होता. माझ्यासाठी आयुष्यातला तो सर्वात खडतर काळ होता. ज्यावेळी मी पुन्हा खेळण्यास सुरुवात केली, त्यावेळी मला काही  आयुष्यातील समस्यांचा सामना करावा लागला.

मात्र या काळात माझ्या परिवाराने मला पाठींबा दिला. जर त्यांचा पाठींबा नसता तर मी पुन्हा उभा राहू शकलो नसतो. त्यावेळी माझ्या मनात तीनवेळा आत्महत्येचा विचारही आला होता. त्या काळात परिवारातला कोणता न कोणता सदस्य माझ्यासोबत 24 तास असायचा. तुमचा परिवार तुमच्यासोबत असेल तर तुम्ही काहीही करु शकता हे मला त्या दिवसांमध्ये कळले आहे.  जर माझा परिवार त्याक्षणी माझ्यासोबत नसता तर कदाचित मी काहीतरी करुन बसलो असतो. यासाठी मी माझ्या परिवाराचा कायम ऋणी राहीन. पुनरागमन केल्यानंतर शमीने भारतीय संघात नाणे  खणखणीत वाजवून दाखवले. भारतीय संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौर्‍यातही तो सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये शमी किंग्ज इलेव्हन पंजाबचं प्रतिनिधीत्व करतो आहे.