‘या’ कारणामुळं शिवसेनेत प्रवेश केला, ऊर्मिला मातोंडकरांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. हिंदू धर्माचा मी अभ्यास केला आहे. वेळ आल्यावर धर्मानुसारच वागेल, असे म्हणत बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेशाबद्दल खुलासा केला आहे. तसेच काम करण्याची संधी दिसली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी (दि. 1) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मातोंडकर यांनी सेनेतील प्रवेशानंतर पुढील वाटचालीबद्दल रोखठोक मत मांडले. सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. ज्या प्रकारे देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो, त्याच प्रमाणे धर्म हा मनातला विषय आहे. त्यामुळे धर्माबद्दल जाहीरपणे बोलण्याबद्दल त्यात काही वाईट वाटण्यासारखे नाही, असे मत मातोंडकर यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस सोडून आता 14 महिने झाले आहे. काँग्रेस पक्ष सोडताना मी राजकारण सोडणार असे बोलले नव्हते. मुळात पद मिळते म्हणून मी पक्ष बदलणाऱ्यातील नाही असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली. वर्षभरात सरकारने चांगले काम केले आहे. उद्धव ठाकरे हे जनतेला मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राला लाभले आहे. त्यांचे काम सर्वांनी पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करायला आपल्याला आवडेल, मी एक शिवसैनिक म्हणून आले आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे, असे म्हणत मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.