‘राष्ट्रपती भवनात माझा छळ झाला’, पाकच्या महिला कार्यकर्तीने ट्विट करून सांगितले काय घडले (व्हिडीओ)

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या मानवाधिकार कायकर्त्या मारिया इकबाल तराना यांनी सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. मारिया यांचा आरोप आहे की, त्या एका समारंभात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या, जिथे त्यांचा छळ करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आम तालीमच्या संस्थापक आणि मानवाधिकार कार्यकर्ता असलेल्या या महिलेने घटनेबाबत अनेक ट्विट केले आहेत. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार कथित पीडित महिलेने ट्विट करून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख केला आहे.

आपल्या एका व्हिडिओत तराने यांनी म्हटले आहे की, त्यांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आले होते. समारंभात जेव्हा त्या पोहचल्या तेव्हा त्यांना आरोपी व्यक्तीच्या जवळ येण्यास सांगण्यात आले आणि जेव्हा त्यांनी असे करण्यास नकार दिला तेव्हा सांगण्यात आले की, त्या समारंभासाठी आमंत्रित नाहीत.

मारिया यांनी म्हटले की, सरकारच्या एका वरिष्ठ आणि जबाबदार अधिकार्‍यासोबत शारीरीक जवळीक बनवण्याची मागणी नाकारल्यानंतर मला सांगण्यात आले की, मी कार्यक्रमासाठी आमंत्रित नाही.

मारिया यांनी या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोपी व्यक्तीचे नावसुद्धा जाहीर केले आहे. सामाजिक कार्यकर्तीने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, या व्यक्तीचे नाव अफाक अहमद आहे, तो चीफ प्रोटोकॉल ऑफिसर आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे आणि दोषीला शिक्षा मिळाली पाहिजे.

डेली पाकिस्ताननुसार तराना पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमध्ये महिलांच्या स्थितीवर काम करणारा आयोग, यूथ फोरम काश्मीर आणि पीपुल्स कमीशन फॉर मायनॉरटी राइटच्या अध्यक्षा देखील होत्या.