मला ED कडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी करत चौकशी सुरू केली. यानंतर ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक याला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, या सर्व प्रकरणांवरती आमदार प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलं आहे.

“ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. मात्र, तरीदेखील छापा टाकण्यात आला आहे,” असा आरोप प्रताप सरनाईक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

घर कार्यालयावर ईडीचे छापे

ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या २३ व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी ८ च्या सुमारास ईडीने धाड मारली. त्याचसोबत सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेस या दोन्ही पुत्रांच्या कार्यालय आणि घरांवरही धाड मारली. ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. यासाठी ईडीने पूर्वतयारी केली होती. ईडीने पोलिसांसोबत स्थानिक प्रशासनालाही याचा सुगावा लागू दिला नाही.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार – संजय राऊत

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, कितीही दबाव आणला तरी महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण सुरुवात तुम्ही केली असेल, तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपला नामोल्लेख न करता दिला.

You might also like