अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात अनेक घडामोडी झाल्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आले. त्यांच्यामध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु असतानाच रात्रीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचवल्या. रात्रीत भाजपला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. राज्याच्या राजकीय वर्तुळात धक्कादायक घडामोडी सुरु असताना आपण झोपलो होतो, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी मी घरात झोपलो होतो.

अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यावर पत्नी आणि मुलीनं मला झोपेतून उठवलं. अजितदादांना शपथ घेताना पाहून मी पुन्हा झोपलो. जाऊ दे, आता झालं ते झालं, अशी माझी त्यावेळची प्रतिक्रीया होती, असे आव्हाड यांनी सांगितले. तसेच अजित पवारांच्या बंडानंतर कार्यकर्त्यांनी त्या विरोधात केलेली घोषणाबाजी म्हणजे त्यांची ती प्रतिक्रिया होती, असेही आव्हाड यांनी सांगितले.

अजित पवार भाजपसोबत गेले असले तरी, शरद पवार आणि भाजप यांचे समीकरण जुळणार नाही, याची खात्री होती. त्यामुळे तेव्हा मी लगेच सक्रीय झालो. ट्विट करून माझी भूमिका मांडली. त्यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेणार असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. शरद पवारांनी लगेच यशवंतराव चव्हाण सेंटर गाठलं. त्यावळी तिथे अजितदादांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. हा त्यांचा संताप होता, त्यांच्या भावना तीव्र होत्या, असेही आव्हाडांनी सांगितले.

अजित पवार परिपक्व नेते
अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांची दोन ते तीनवेळा भेट झाली. मात्र, त्यांच्या मनात कोणतीही कटुता नव्हती. ते अतिशय परिपक्व नेते आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून झालेली घोषणाबाजी परिस्थितीवरील प्रतिक्रीया होती, अजित पवारांना त्याची कल्पना होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

Visit : policenama.com