मुक्ताईनगरला पोहचताच खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘… तर मी घरीच बसलो असतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (Bjp) सोडले नसते तर माझा अडवाणी, वाजपेयी केला असता असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी केला. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष मला संन्यास घेण्यास सांगत होते, मी राजकारणातून बाहेर पडून सल्लागार व्हावे अशी त्यांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. मुक्ताईनगरमध्ये पोहचल्यानंतर खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश केल्यानंतर खडसे हे मुक्ताईनगरला आल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. भाजपमध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरु होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. पण देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. मात्र, शरद पवार यांच्यामुळे मी पुन्हा राजकारणात आलो, असे खडसे म्हणाले.

अडवाणी अटीलजींच्या बाबतीत जे झाले तेच माझ्या बाबतीत झाले असते. पण मी गप्प बसणारा नव्हतो. मी संन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती. मार्गदर्शन करावे असं ते म्हणत होते. मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवारांनी (sharad pawar) मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी घरीच बसलो असतो…
मी घरी बसलो असतो, मात्र शरद पवार यांनी पुन्हा मला राजकारणात आणले. येणारा काळ ठरवेल पुढे काय होईल. विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करुन त्यांना पाडले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसेंच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडीओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते.