भाजपमध्ये जाणार नाही, पण शुक्रवारी निर्णय जाहीर करणार : सत्तार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी भेट झाली असली तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा माझा कोणताही विचार नाही. शुक्रवारी (मार्च २९ रोजी) कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून या मेळाव्यातच मी पुढील निर्णय घेणार असल्याचे सिल्लोड मतदारसंघाचे कॉंग्रेस बंडखोर माजी आमदार अब्दूल सत्तार यांनी येथे स्पष्ट केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आपले नेते आहेत. त्यामुळे माझा भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतू, येत्या २९ मार्च रोजी आयोजीत केलेल्या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मी पूढील निर्णय घेणार आहे. मी केलेल्या बंडानंतर कॉंग्रेसने मला औरंगाबादची ऑफर दिली असल्याचा दावाही अब्दूल सत्तार यांनी माध्यमाशी बोलतांना केला.

सत्तार यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली होती यामागचा खुलासाही केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात विकासकामांसाठी खुप चांगली मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य होते, त्यामुळे मी त्यांची भेट घेतली होती. सत्तार म्हणाले की, मी आज काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची नगरला जाऊन भेट घेणार आहे.

खंर तर सत्तार यांना औरंगाबादमधून लोकसभेचं तिकीट हवं होतं. पण तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनाम दिला होता. त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद आयोजीत करुन आज आपली भूमिका स्पष्ट केली.