…तर वाराणसीत PM मोदींचा ट्रम्प करून दाखवेन : काँग्रेस खासदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात लढण्यासाठी कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठीनी आदेश दिल्यास आपण पंतप्रधान मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवून देऊ, अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. मी पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात माहिती दिली आहे. सर्वांना सांगितलं आहे की मी तयार आहे. माझी एक अट आहे. की मोदींनीसुद्धा एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवावी. एकतर ते राजकारणात राहतील किंवा मी राहीन, असे आव्हान खा. धानोरकर यांनी दिले.

खासदार धानोरकर म्हणाले की, माझी आतापर्यंतची कारकीर्द पाहिल्यास मी इतिहास घडवलेला माणूस आहे. इतिहास घडवायचा हाच माझा उद्देश आहे. राजकरणात येण्यासाठी किंवा पद, मंत्रिपद घेण्यासाठी माझा जन्म झालेला नाही असे ते म्हणाले. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आज माझ्याकडे तीन वर्षांचा कालावधी आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावा, बाळू धानोरकर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीला जावा. मग तिथे जाऊन निवडणूक नाही लडलो आणि नरेंद्र मोदींना नाही पराभूत केल तर मी बाळू धानोरकर नाही, असा इशाराच खा. धानोरकरांनी दिला आहे.

खा. धानोरकर म्हणाले की, हा बाळू धानोरकर काही कमकुवत नाही. 2014 मध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले तेव्हा मी शिवसेनेचा पूर्व विदर्भातील एकमेव आमदार होतो. पुढे 2019 मध्ये मला भाजपाचे काही विचार पटले नाहीत म्हणून मी शिवसेना सोडून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि अवघ्या 15 दिवसांच्या काळामध्ये मी हंसराज अहिर या तीन वेळा निवडून आलेल्या नेत्याला पराभूत केले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.