रेशन ग्राहक आणि दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी लक्ष घालेन : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गोरगरीब रेशनकार्ड धारकांना तसेच रेशन दुकानदारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लक्ष घालेन असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले.

शिवाजीनगर मतदार संघ रेशन दक्षता समितीची (परिमंडळ कार्यालय क) बैठक आमदार शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीला समितीचे सदस्य दत्तात्रय खाडे, आदित्य माळवे, राजश्री काळे, रविंद्र साळेगांवकर, गणेश बगाडे तसेच रेशन दुकानदार उपस्थित होते. रेशनवर आठ रु किलो तांदूळ, बारा रुपये किलो गहू अशा भावाने धान्य मिळते. परंतु वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये असलेल्यांनाच या दराने धान्य दिले जाते. उत्पन्न मर्यादेची ही अट शिथील करावी, उत्पन्नाचा दाखला मिळविण्याइतकीही आर्थिक क्षमता गरीबांची नसते. त्यामुळे दाखल्यासाठी पर्यायी तोडगा काढावा, अशा सूचना दुकानदारांनी केल्या. शासनाकडे अनेकवेळा पैसे भरुनही धान्य मिळत नाही अशा तक्रारी करण्यात आल्या. पोर्टेबिलिटीचा मुद्दाही विचारात घ्यावा, त्यातून दुकानदारांना त्रास होऊ नये अशीही सूचना दुकानदारांनी केली.

सध्या कोरोना साथीच्या काळात लोकांना आर्थिक समस्या उद्भवतात. अशावेळी रेशनवरील धान्य मिळण्यात समस्या येत असतील तर त्या सोडविण्यासाठी मी, पाठपुरावा करीन आणि दक्षता समितीची नियमित बैठक घेऊन आढावा घेईन असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.