‘मी ना डॉक्टर ना पोलीस, परवानगी मिळाल्यानंतर लस घेईन’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस आदीना कोरोना लस दिली जाणार आहे. आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील की यांनीही लस घेतली पाहिजे, तेव्हा आम्ही लगेच लस घेऊ अन् तुम्हाला देखील सांगू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लसीकरण,मुंडे प्रकरण आणि सीरममध्ये लागलेल्या आगीच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. पवार म्हणाले, सध्या लसीकरणाबाबत अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60/65 टक्के लसीकरण झाले आहे. मात्र शहरात 25/30 टक्के लोकांनीच लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन अ‍ॅपची समस्या आहे, अशी कारणे आहेत. खासगी डॉक्टर्सनाही लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबतही निर्णय घेऊ असे पवार म्हणाले.