माझ्या भाजप सोडण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : पंकजा मुंडे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – लाक्षणिक उपोषण मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर लक्षवेधून घेण्यासाठी सकारात्मक भावनेने केले होते. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की घेतील असा आशावाद भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच मी भाजप सोडणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे देखील आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. विभागीय आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजप नेत्यांचे आभार मानले.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, कार्यकर्ते सध्या चांगलं वागत आहेत. विरोधात असताना तुम्ही चांगलं वागता का ? त्यामुळे विरोधातच बसावं का ? असा मिश्किल सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला. नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. 100 दिवसांत मी त्यांच्यावर टीका करणार नाही असे सांगत मी मराठवाड्यात समाजसेविका म्हणून काम करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटल आहे.

मराठवाड्यातील प्रश्न गंभीर असून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. येथील शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करुन द्या. त्यांना कर्जमाफीचीही गरज पडणार नाही. ही लढाई हक्काच्या 17 टीएमसी पाण्यासाठी आहे. भाजप – सेना युतीच्या काळात मराठवाड्यासाठी अनेक जलसिंचन प्रकल्पांची आखणी करण्यात आली होती. आता ते प्रकल्प लवकर कसे पूर्ण होतील याची काळजी या सरकारने घेयची आहे. तसेच मराठवाड्यातील कोणतेही सिंचन प्रकल्प बंद करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठवाड्याती शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसेच आमच्या पेक्षा चांगले काम करून दाखवा असे आवाहनही त्यांनी ठाकरे सरकारला केले. मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला असून या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार चांगले काम करेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.