मी पंकजा गोपीनाथ मुंडे… तुम्हाला वचन देते की… तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे परिणाम भाजपावर झाल्याचे पाहायला मिळते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्राचा विचार करता भाजपा राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी कांदा उत्पादकांना अनुदान दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आपोआप पैसे सुद्धा जमा होऊ लागले आहेत . त्यातच आता नांदेड येथे राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला मोठं आश्वासन दिले आहे. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही, असं जाहीर वचन पंकजा मुंडे यांनी नांदेड येथे बोलतांना दिले.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, “मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हाला वचन देते की, तुमच्या आरक्षणाचा विषय होईपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही. आम्ही पुन्हा सत्ता काबीज करणार आहोत. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकत नाही, याचा विश्वास आहे, असं पंकजा म्हणाल्या. धनगर आरक्षणाच्या निर्णायाशिवाय पुन्हा भाजपाची सत्ता येणार नसल्याचंही पंकजा यांनी जाहीरपणे कबुल केलं. या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकरही उपस्थित होते.
धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर जाण्याची, तुमच्यासोबत मेंढरामागे येण्याची तयारी असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिला. “धनगर आरक्षणात कोणी आडकाढी आणली तर ही काढी उगारायला मागे-पुढे बघणार नाही,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.