‘कुणी किती भूखंड घेतले ते काही दिवसात सांगेन !’ : एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही उपस्थित होते. मुंबईतील राष्ट्रवादी प्रवेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी धडाकेबाज भाषण देत खडसेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या बदलेल्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव न घेता खडसेंनी थेट आव्हान दिलं.

‘कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन’
एकनाथ खडसे म्हणाले, “माझ्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. अँटी करप्शन विभागाची चौकशी लावण्यात आली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मला छळलं गेलं. आता थोडे दिवस जाऊ द्या. खरं काय ते मी तुम्हाला सांगेन. कुणी किती भूखंड घेतले ते मी दाखवेन. नियमाच्या बाहेर जाऊन जर कुणी काही केलं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी असं माझं मत आहे आणि तशी मागणीही मी सरकारकडे करणार आहे” असं म्हणत आधीच्या सरकारच्या काळातील भूखंड घोटाळे बाहेर काढण्याचे खडसेंनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

‘दिल्लीतील काही भाजप नेत्यांनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला’
भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करताना खडसे म्हणाले, “गेली 4 वर्षे मी अन्याय सहन केला. हा अन्याय दूर होईल अशी मला अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. पक्षात येऊन 4 दिवस नाही झाले तेसुद्धा मला सल्ले देऊ लागले आहेत. दिल्लीतील काही भाजप नेत्यांनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता. भाजपत तुम्हाला यापुढं काही भवितव्य नाही अंस मला या नेत्यांनीच सांगितलं” असा गौप्यस्फोटही यावेळी खडसेंनी केला.

You might also like