‘मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार’ : उर्मिला मातोंडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिनं अखेर आज (मंगळवार दि 1 डिसेंबर 2020) शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत उर्मिलानं हातावर शिवबंधन बांधलं आणि नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. यानंतर उर्मिलानं पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे असंही तिनं यावेळी स्पष्ट केलं.
उर्मिला म्हणाली, सिनेसृष्टीत कारकीर्द सुरू केली तेव्हा मी साध्या सुध्या मराठी घरातून आलेली मुलगी होते. मी पीपलमेड स्टार आहे. मला पीपलमेड लिडर व्हायला आवडेल. शिवसेना प्रवेशासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. विधान परिषदेसाठी माझं नाव दिल्याचंही मला कळतं आहे.
कंगनानं काही टीका केली तर तुम्ही उत्तर देणार का असा प्रश्न विचारल्यांतर उर्मिला म्हणाली, मी त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही.
पुढं बोलताना उर्मिला म्हणते, शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. वर्षभरात महाविकास आघाडीनं खूप चांगलं काम केलं. कोरोना काळात, वादळ किंवा इतर संकटातही मी त्यांना चांगलं काम करताना पाहिलंय. सर्व धर्माच्या लोकांना सरकारनं समान वागणूक दिली. ही बाब मला महत्त्वाची वाटते असंही उर्मिलानं सांगितलं.