छुओ ना मेरी हस्ती को, फूंक दूंगी तेरी बस्ती को : वादग्रस्त आयएएस (IAS) अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआय छाप्यानंतर आता आयएएस अधिकारी बी. चंद्रकला यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. चंद्रकला यांनी लिंक्ड इनवर एक कविता शेअर केली आहे. ‘छुओ ना मेरी हस्ती को, फूंक दूंगी तेरी बस्ती को,अशा या कवितेच्या ओळी आहेत. या कवितेद्वारे त्यांना कुणावर निशाणा साधायचा होता, याबाबत आता मोठी चर्चा होत आहे.
सीबीआयने छापे मारल्यानंतर आय ए एस अधिकारी बी. चंद्रकला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणुकीमुळेच सीबीआयकडून छापे मारण्यात येत आहेत,’ असा म्हणत चंद्रकला यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवरच आरोप केला आहे.

‘रे रंगरेज ! तू रंग दे मुझको’ ही कविता ‘लिंक्ड इन’वर शेअर करत बी चंद्रकला यांनी म्हटलंय की, ‘चुनावी छापा तो पड़ता रहेगा, लेकिन जीवन के रंग को क्यों फीका किया जाय.’

उत्तर प्रदेशातील आय ए एस अधिकारी बी. चंद्रकला या सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापेक्षाही जास्त पॉप्युलर आहेत. पण बी. चंद्रकला या सध्या चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या बी. चंद्रकला याच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सध्या उत्तर प्रदेशात काम करत असलेल्या बी. चंद्रकला यांच्यावर खाण घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. बी. चंद्रकला यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांची अनेक ठिकाणी बेनावी संपत्ती असण्याचीही शक्यता आहे. बेनावी संपत्ती आणि खाण घोटाळ्यासंदर्भातला आरोप यामुळे सीबीआयकडून वारंवार त्याच्या संपत्तीवर छापा मारण्यात येत आहे.

बी. चंद्रकला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांचे ८५ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये बी चंद्रकला या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी त्यांचा फोटो काढणाऱ्या एका १८ वर्षांच्या मुलाला जेलमध्ये टाकले होते.
या अटकेसंदर्भात विचारण्यासाठी एका रिपोर्टने चंद्रकला यांना फोन केला तेव्हा त्यांनी आपल्या उत्तरातून वाद ओढवून घेतला होता. चंद्रकला यांनी त्या रिपोर्टरच्या घरी एक अज्ञात व्यक्ती पाठवण्याची धमकी दिली होती.

मूळ हैद्राबादच्या असणाऱ्या चंद्रकला यांची पहिल्यांदा युपीच्या बुलंद शहर इथे पोस्टिंग झाली होती. खराब रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सवरील कारवाईमुळे बी चंद्रकला आधी चर्चेत आल्या होत्या. या धडक कारवाईमुळे त्यांची मथुरा इथे बदली करण्यात आली. चंद्रकला यांची पहिली बदली ही अवघ्या १२९ दिवसांत करण्यात आली होती. त्या मथुराच्या दुसऱ्या महिला जिल्हादंडाधिकारी ठरल्या.
पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांनंतर आता चंद्रकला यांच्या संपत्तीवर सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे. या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागपत्रही सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागपत्रही सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे. एकूणच सध्या बी चंद्रकला यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.