श्रीकर परदेशी पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवडचे आयुक्त, नांदेडचे जिल्हाधिकारी किंवा नोंदणी महानिरीक्षक म्हणून आपल्या कामाची छाप पाडणारे तसेच प्रशासकीय वर्तुळात कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने डॉ. परदेशी यांची निवड केली आहे.
[amazon_link asins=’B07FK5SY81′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e88260d-9711-11e8-b062-cd9aac9238da’]
पंतप्रधान कार्यालयाने देशातील दहा तरुण अधिकाऱ्यांना मुलाखतीसाठी पाचारण केले होते व त्यातील चौघांची निवड केली आहे. त्यात डॉ. परदेशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊनच पंतप्रधान कार्यालयाने डॉ. परदेशी यांच्या नावाला पसंती दिली आहे. डॉ. परदेशी यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी अर्जही केला नव्हता. पंतप्रधान कार्यालयाने त्यांची निवड केल्याने पुढील आठवडय़ात ते नवी दिल्लीत जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी असताना त्यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. तसेच सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी त्यांनी उपक्रम राबविला होता. नांदेड जिल्हाधिकारीपदी असताना कॉपीला आळा तसेच शाळांमधील पटपडताळणीचा कार्यक्रम राबविला होता. तो पुढे राज्यभर राबविण्यात आला. नोंदणी महानिरीक्षक म्हणून राज्यातील नोंदणी कार्यालयांमधील भ्रष्टाचार आणि दलालांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच ऑनलाइन नोंदणीची योजना सुरू केली.