Coronavirus : दिलासादायक ! ‘कोरोना’ व्हायरसवर परिणामकारक जडी-बूटी मिळाली, ICAR चा दावा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाची प्रकरणे अजूनही कमी होत नाहीत. कोरोना व्हायरस संसर्ग दूर करण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र लस तयार करण्यात व्यस्त आहेत. या सर्वांमध्ये भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या (ICAR)अंतर्गत नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स (एनआरसीई) च्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, औषधी वनस्पती (हर्बल प्लांट)मध्ये असे कंपाऊंड आहे जे कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर तेजीने परिणाम करु शकतात. शुक्रवारी आयसीएआरनेही या संशोधनाची औपचारिक नोट प्रसिद्ध केली आहे. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कोरोना बरा करण्यासाठी हर्बल वनस्पतीचा वापर केला जाऊ शकतो.

नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सचे महासंचालक (अ‍ॅनिमल सायन्स) बीएन त्रिपाठी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आमच्या संशोधनात असे आढळले आहे की काही वनस्पती व्हायरसवर चांगले परिणाम देतात. ते म्हणाले की, यावेळी मला एवढेच सांगायचे आहे की सध्या हर्बल वनस्पतींचा वापर देशात अनेक आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी केला जात आहे. अशा परिस्थितीत ही वनस्पती कोरोना विषाणूला नष्ट करण्याचे काम करत असतील तर ते केवळ देशासाठीच नाही तर जगासाठीही दिलासा देणारी बातमी ठरेल.

असे सांगितले जाते की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वेळी आपत्कालीन परिस्थिती पाहता आयसीएआर-एनआरसीई हिसारच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे काही नवीन संशोधन केले. सामान्य मनुष्य वापरत असलेल्या नैसर्गिक वस्तूंवर त्यांनी हे संशोधन केले. त्यानंतर वैज्ञानिकांनी चिकन कोरोना व्हायरस संसर्गाच्या मॉडेलचा उपयोग वनस्पतींच्या अँटीव्हायरल प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी केला. चिकन कोरोना व्हायरसचा शोध प्रथम 1930 मध्ये लागला होता.

आयसीएआरच्या नोटमध्ये म्हटले आहे की, प्राथमिक अभ्यासानुसार एक नैसर्गिक उत्पादनाने (व्हीटीसी-अँटीसी 1) आयबीव्ही कोरोना विषाणूविरूद्ध चांगले परिणाम दिले आहेत. यामधून कोंबड्यांच्या भ्रुणांना वाचविण्यात यश मिळाले, असे या चिठ्ठीत म्हटले आहे. आयसीएआरने दावा केला आहे की, व्हीटीसी-अँटीसी 1 मध्ये कोरोना विषाणूचा उपचार करण्याची क्षमता आहे.