ICC World Cup 2019 : बांगलादेशकडून २००७ ची ‘पुनरावृत्ती’ ; आफ्रिकेला २१ धावांनी केलं ‘पराभूत’

ओव्हल : वृत्तसंस्था – बांगलादेशने ओव्हलवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत करून इतर संघांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. बांगलादेशने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक कामगिरीची नोंद करताना दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी विजय मिळवत आपल्या प्रवासाची सुरुवात विजयाने केली आहे.

प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने विक्रमी धावसंख्येची नोंद केली. बांगलादेशने ३३१ धावांचे आव्हान दिले होते. आफ्रिकेकडून इम्रान ताहीर, फेहलुक्वायो आणि मॉरिसने प्रत्येकी २ बळी घेत बांग्लादेशला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. या सामन्यात बांग्लादेशच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या सलामीवीरांनी ६० धावांची भागिदारी केली. त्यानंतर मधल्या फळीतील शाकिब अल हसन आणि मुश्फिकर रहिम यांच्या १४२ धावांच्या भागिदारीने संघाला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानंतर तळाच्या फलंदाजानी केलेल्या फटकेबाजीमुळे बांगलादेशने ५० षटकात ३३० धावा केल्या.

मात्र या आव्हानासमोर आफ्रिकेचा संघ टिकू शकला नाही आणि त्यांना ५० षटकात ८ बाद ३०९ धावाच करता आल्या. ३३० धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. सलामीवीर क्विंटन डि कॉक आणि ॲडन मर्करम यांनी ४९ रन्सची भागिदारी केली. रहीमने डी कॉकला धावबाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर फलंदाजांना आवश्यक धावगती ठेवण्यात यश आले नाही आणि अखेर बांगलादेशने हा सामना २१ धावांनी जिंकला. बांग्लादेशकडून मुस्तफिझुर रहमानने ३ सैफुद्दीनने २ तर हसन आणि शाकिबने प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

सर्वोच्च धावसंख्या

बांग्लादेशच्या अष्टपैलू शाकीब अल-हसन आणि मुश्फिकुर रेहमान यांनी जोरदार फटकेबाजी करत ३३० धावा उभ्या केल्या. बांग्लादेशची वन-डे आणि विश्वचषक संघातली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी वन-डे क्रिकेटमध्ये २०१५ मध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध ३२९ रन्सचा पल्ला गाठला होता.
दरम्यान, बांगलादेशकडून अष्टपैलू खेळी करणाऱ्या शकिब अल हसनला (७५ धावा, १बळी) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. तर याआधी बांगलादेशकडून त्यांना २००७ च्या वर्ल्ड कपमध्येही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. वर्ल्ड कपमध्ये आशियाई संघांतील बांगलादेश असा एकमेव संघ आहे ज्यांनी आफ्रिकेला दोन वेळा पराभूत केलं आहे. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी आफ्रिकेला वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदाच हरवलं आहे.