‘टीम इंडियाला’ मोठा दिलासा, भुवनेश्वर कुमार एकदम ‘फिट’

मँचेस्टर : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा डाव्या पायाचा स्नायू दुखावल्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा जवळजवळ संपूर्ण सामना खेळू शकला नव्हता त्यानंतरचा अफगाणिस्तानबरोबरचा सामनादेखील तो खेळू शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर तो वर्ल्ड कप मधील पुढील सामन्यांमध्ये तो संघात नसेल असे संकेत मिळत होते. मात्र आता यासंदर्भात एक आनंदाची बातमी असून भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा मैदानात उतरन्यासाठी तयार होत आहे.

भुवनेश्वरने नेटमध्ये आज जवळपास ३५ मिनिटे गोलंदाजीचा कसून सराव केला. यावेळी भुवीन पूर्ण रन अप घेऊन गोलंदाजी करताना दिसला. त्यामुळे तो गुरुवारी वेस्टइंडिजविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे दिसून येत आहे. फिजिओ पॅट्रिक फरहाट यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वर कुमारने आज सराव केला. गोलंदाजी करताना त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नव्हता. या सरावावेळी कर्णधार विराट कोहलीनेही हजर राहून एकंदर परिस्थितीची पाहणी केली.

वेगवान गोलंदाज नवदीप सैनी इंग्लंडमध्ये दाखल झाला असल्याने भुवनेश्वरच्या जागी त्याला संघात स्थान दिलं जाईल, अशाही चर्चा होत होत्या. अधिकृत सूत्रांनी मात्र नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी नवदीपला पाचारण करण्यात आल्याचे स्पष्ट करत ही शक्यता फेटाळली आहे.

वर्ल्ड कप च्या मोहिमेवर असणाऱ्या असलेल्या भारतीय संघासाठी भुवनेश्वर कुमार सारखा हुकुमी गोलंदाज नसणे धक्कादायक होते मात्र आता त्याच्या उपस्थितीने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळेल असे दिसते.