World Cup 2019 : …म्हणून विंडीज विरुद्ध झालेल्या पराभवानंतरही ‘पाकिस्तान’ खूश

लंडन : वृत्तसंस्था – विश्वचषकातील काल झालेल्या सामन्यात विंडीजने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. अवघ्या १०५ धावांत संपूर्ण पाकिस्तानचा संघ ढेपाळला. ओशेन थॉमस आणि जेसन होल्डरच्या प्रभावी माऱ्यापुढे पाकिस्तानचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही.

या पराभवाने त्यांची जुनी जखम पुन्हा ताजी झाली. पहिल्यांदा फलंदाजांनी आणि पुन्हा गोलंदाजांनी निराशा केल्यानं त्यांना पराभव पत्करावा लागला. तरीही पाकिस्तानला एका वेगळ्या योगायोगामुळे वर्ल्ड कप विजेता होऊ शकतो.

१९९२ च्या विश्वचषकात देखील पाकिस्तानचा पहिला सामना विंडीजविरुद्ध झाला होता. त्यात विंडीजने विजय मिळवला होता. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २ बाद २२० धावा केल्या होत्या. रमीज राजा याने शानदार शतकी खेळी करत १०२ धावा केल्या होत्या तर जावेद मियाँदाद याने अर्धशतकी खेळी केली होती.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजने ४६.५ षटकात बिनबाद २२१ धावा करत शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात ब्रायन लारा ८८ धावा काढून रिटायर झाला. तर देसमंड हायनसने नाबाद ९३ धावा केल्या. कर्णधार रिची रिचर्ड्सनने नाबाद २० धावा काढल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना गमावला जरी होता तरी त्यांनी १९९२ मध्ये विश्वकप जिंकला होता.

त्याचप्रमाणे २००९ मध्ये झालेल्या २०-२० विश्वचषकात देखील त्यांनी पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर चांगली कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे याच कामगिरीची पुनरावृत्ती करून पाकिस्तान या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.