वर्ल्डकप हातातून निसटला तरी चालेल पण भारताविरुद्ध सामना जिंकलंच पाहिजे : इंझमाम उल-हक

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेट निवड समितीचा प्रमुख इंझमाम उल-हक याने वर्ल्डकप स्पर्धेत आमचा संघ भारताला नक्कीच पराभूत करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत इंझमामने आपले मत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला अद्याप वर्ल्डकप स्पर्धेत भारताला पराभूत करता आलेले नाही.

भारत-पाकिस्तान मॅचविषयी बोलताना इंझमाम उल-हक म्हणाला आहे की, भारत-पाकिस्तान लढतीला प्रेक्षक खूपच गांभीर्याने घेतात. पाकिस्तानमध्ये म्हंटले जाते की वर्ल्डकपमध्ये फक्त भारताविरुद्ध जिंकलात तरी चालेल. वर्ल्डकपमधील भारताविरुद्धच्या पराभवाची पाकिस्तानची मालिका थांबेल अशी मला अशा वाटते. मात्र वर्ल्डकप स्पर्धा फक्त भारताविरुद्धच्या लढतीपुरतीच मर्यादित नाही, हे संघाने लक्षात ठेवावे.

आयसीसी वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मेपासून वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. भारताने वर्ल्डकपमध्ये सहावेळा पाकिस्तानला हरवले आहे. येत्या १६ जूनला भारत-पाकिस्तान या पारंपरिक कट्टर विरोधकांचा सामना रंगणार आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान समोरासमोर येणार आहेत.